अमृतस्वरूपा भक्ति

Articles

नारद भक्तिसूत्रांमध्ये भक्तिची व्याख्या करताना ’ सा त्वस्मिन् परमप्रेमरुपा ।’ असे तिचे लक्षण सांगीतले आहे. ’भक्ति’ या शब्दाचा साधा सरळ अर्थ ’सेवा करणे’ (भज्-सेवायाम्). व्यापक अर्थाने पाहता भक्तिया संकल्पनेमध्ये प्रेम, सेवा, समर्पण, पूजा, अर्चना अशा अनेक अर्थ समाविष्ट होताना दिसतात. तरीदेखील भक्ति ही खऱ्या अर्थाने ’प्रेम’ या संकल्पनेवर आधारलेली आहे. भक्ति म्हणजे प्रेम का? तर नव्हे. भक्ति ही प्रेमरुप आहे.या सूत्रामध्ये भक्तिचे तटस्थ लक्षण सांगीतले आहे. म्हणजेच प्रेमामधील उत्कटता, सेवाभाव, समर्पणवृत्ति, ऒढ वगैरे भक्तिमध्ये अपेक्षित आहेत. परंतु लौकिक प्रेमाची तुलना मात्र भक्तिशी करता येणार नाही. इहलोकीचे प्रेम हे कामयुक्त, अज्ञानमूलक, अस्थिर व अनित्य असते. म्ह्णूनच भक्तिचे लक्षण करताना प्रेमाला ’परम’ असे विशेषण लावले आहे. त्यामुळेच भक्ति ही लौकिक प्रेमापेक्षा वेगळी असल्याचे दर्शविले आहे. अलौकिक प्रेम म्हणजे भक्ति. निरपेक्ष, नि:संग, निरिच्छ, स्थिर व शाश्वत प्रेमालाच भक्ति असे म्हटले आहे. ’सा तु न कामयमाना।’ असे सांगून भक्ति ही कामप्रेरित नसते हे सांगीतले आहे. मनुष्याची कृती ही सामान्यत: इच्छेतून निर्माण होत असते. भक्ताला कोणतीही इच्छा पूर्ण करायची नसते कारण हा भक्त नित्यतृप्त असतो. ’सा एव ग्राह्या मुमुक्षुभि:।’ असे जरी म्ह्टलेले असले तरी भक्ताला मोक्षाचीही अपेक्षा त्याला राहत नाही. भक्ति हेच त्याच्यासाठी ’साधन’ व ’साध्य’ होऊन गेलेले असते. सदा भगवद्भक्तिमध्ये मग्न व्हावे हेच जीवनाचे ईप्सित होते व हाच भक्तिमार्गीयांचा मोक्ष होय. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात- ’नलगे मुक्ति आणि संपदा’… भगवंताचे गुणसंकीर्तन करत राहणे याच उदात्त भावनेने मन व्यापृत होते. गर्भवास देखील नकोसा वाटत नाही व जन्ममरण यांचा फेरादेखील बंधनास कारणीभूत ठरत नाही.

’अमृतस्वरुपा च ।’ या सूत्रामध्ये भक्तिचे स्वरुपलक्षण सांगीतले आहे. प्रेमरुपा व अमृतस्वरुपा या शब्दांमधील भेद लक्षात घेण्याजोगा आहे. ’प्रेम्ण: रूपमिव रूपम् अस्या सा।’  म्हणजेच भक्ति ही प्रेमासारखी आहे. परंतु ती साक्षात् अमृतस्वरूप आहे. ’अमृतमेव स्वरूपम् अस्या: सा।’

’अमृत’ या शब्दाने अनेक अर्थ होतात. अमृत म्हणजे नष्ट न होणारे असे शाश्वत तत्त्व. भक्ति ही अविनाशी होय. उपनिषदांमध्ये ’अमृत’ हा शब्द मोक्ष या अर्थी येतो. भक्ति ही साक्षात् मोक्षस्वरूप आहे. भक्त व मुक्त यांच्यातील सीमारेषा फारच पुसट आहे. शरीर-मन-बुध्दि-इन्द्रिय यांच्या पलीकडे गेलेल्या भक्ताला कसलीच भीति उरत नाही.संत नामदेव म्हणतात- ’काळदेहासीआलाखाऊ।आम्हीआनंदेनाचूगाऊ।’सर्व संतांना मोक्षदेखील भगवद्भक्तिपुढे खूपच नगण्य वाटू लागतो. भक्ति ही भक्तांना मोक्षाचे साधन नसून ते साधन व साध्य दोन्ही असते. भगवंताच्या भक्तिमध्ये लीन राहण्याचा परमानंद त्यांना मोक्षासमोर श्रेष्ठ दर्जाचा वाटू लागतो. त्यामुळे भक्ति म्हणजेच मोक्ष अथवा अमृतत्व. खऱ्या भक्ताला प्राप्त करण्यासारखे काही राहतच नाही तर तो अमृतत्त्व तरी कशाला प्राप्त करील? भक्ति हेच तर अमृत होय ज्याच्या प्राशनाने तो सर्व सांसारीक बंधनातून तो मुक्त होतो. भगवंताच्या नामगुणसंकीर्तनातून मिळणारा आनंद मोक्षापेक्षाही वरचढ असतो. म्हणूनच नारदभक्तिसूत्रामध्ये भक्त्तिची व्याख्या करताना तिला अमृतस्वरूपा म्हटले आहे.

उच्चतम प्रेमासारखे रूप असणाऱ्या भक्तिचे खरे स्वरूप ’अमृत’ आहे असे सांगून नारद तिला पारमार्थिक फलरूपत्व देतात. मोक्षाच्या इतर सर्व मार्गांपेक्षा असलेले भक्तिचे श्रेष्ठत्वदेखील सूचित होते. ज्ञान, कर्म वगैरेंची गणना साधनभावामध्ये होते तर भक्ति मात्र साध्यरूप आहे.